मुख्य सामग्रीवर वगळा

विजयनगर साम्राज्य

"हंपी" हे मंदिरांच शहर माहिती नसलेला भारतीय आपल्याला क्वचितच सापडेल. तिथल्या मंदिरांचे अवशेष पाहून तत्कालीन वैभव आणि संस्कृतीने आपला उर आपोआप भरून येतो. पण बऱ्याच जणांना माहिती नसेल की "हंपी" हे शहर विजयनगरची राजधानी होती.


चला तर आज जाणून घेऊया याच "विजयनगर" साम्रज्याबद्दल...

हंपीच्या ४० ते ५० किमी परिसरात भग्नावस्थेत उभे असलेले महाल, देवदेवतांच्या मूर्ती, विविध दगडी कमानी, स्नानकुंडे, बाजारचा मुख्य रस्ता, बाजूने दुकानांच्या जागा यांचे बरेच अवशेष पाहायला मिळतात.
तत्कालीन पोर्तुगीज प्रवासी डॉमीगो प्रेस म्हणतात, "हंपी सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेले जगातील सर्वात उत्तम शहर अशी त्याची ख्याती इराक-इराणपर्यंत होती." तर पर्शियन प्रवासी अब्दुल रझाक लिहितो, "माझ्या नेत्रांनी हम्पी इतके अप्रतिम शहर कुठेही पाहिलेले नाही."


अनेक टेकडय़ांवर वसलेल्या शहराला एकामागोमाग वर्तुळाकार बांधकाम केलेली सात कोटांची तटबंदी, भर बाजारात दिवसाढवळ्या चांदी, सोने, हिरे, माणके, केशर यांचे ढीगचे ढीग विक्रीसाठी. देशी परदेशी व्यापाऱ्यांच्या झुंडी याने बाजार फुलून जात असे. राज्याचा विस्तार थेट ओरिसापासून केरळपर्यंत होता. राजाजवळ ७ ते ८ लाख सैन्य होते. चलनात सोन्याची नाणी होती. विजयनगर म्हणजे सुवर्णनगरीच होती.


ही सुवर्ण नगरी राजधानी असलेल्या विजयनगर साम्राज्याची पायाभरणी केली ती वरंगळच्या "हरिहर" व "बुक्क" या दोन भावांनी...

हे एकूण पाच भाऊ होते. या भावांपैकी तिघे पूर्व किनाऱ्यावरील नेल्लोरपासून ते पश्चिम किनाऱ्यावरचे बेळगाव येथेपर्यंत राज्य करत होते. महाराष्ट्र हा हरिहरच्या अंमलाखाली होता. दुसरा भाऊ होता कंप. याचे उदयगिरी नावाचे राज्य होते.

मधला भाऊ बुक्क. त्याच्या ताब्यात होयसळांचे हळेबीड, पेनुगोंडचा किल्ला व आसपासचा प्रदेश होता. त्याच्याही दक्षिणेकडे शिमोगाजवळील अरग येथे एक भाऊ राज्य करत असे व शेवटचा भाऊ बुक्कच्या हाताखाली सरदार होता.

इस्लामशी टक्कर घेऊन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे या भावंडांचे ध्येय होते. यांनी अत्यंत हुशारीने "विजयनगर" ही मध्यवर्ती सत्ता मानून आपले साम्राज्य उभे केले होते. बुक्करायाचा "कंपराय" नावाच मुलगा होता. त्याने वीरबल्लाळच्या ताब्यात असलेले मदुरा काबीज केले.



कंपरायही बुक्कप्रमाणे मोठा शूर व कर्तबगार होता त्याच्या कारकिर्दीत त्याने दाखवलेल्या कर्तबगारीची वर्णने त्याच्या पत्‍नीने लिहिलेल्या एका “कम्पराजविजयम्” या संस्कृत काव्यग्रंथात आली आहेत. त्याने बुक्कराय राजाच्या मृत्यूनंतर दुसरा हरिहर असे नाव धारण करून स्वतःला विजयनगरच्या साम्राज्याचा पहिला सम्राट म्हणून घोषित केले. 

इ .स. १३२३ मध्ये वरंगळचे राज्य तुघलकने जिंकले. त्यावेळी हरिहर आणि बुक्कराय यांना तुघलकांनी बंदी बनवून दिल्लीला नेले. काही दिवसांनी त्यांना इस्लाम धर्मात घेऊन तुघलकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना दक्षिणेकडे पाठविले. तेथे त्यांनी इ .स. १३३६ मध्ये डोंगरांनी व जंगलांनी वेढलेल्या भागात नवी वसाहत स्थापन करून तिला शृंगेरीच्या स्वामी विद्यारण्य सरस्वती यांच्या आशीर्वादाने विजयनगर हे नाव दिले.


पुढे हेच विजयनगर साम्राज्य साहित्य व संस्कृतीचे विशाल दालन ठरले. विरुपाक्ष राय (दुसरा) याची हत्या करवून नरसिंहरायने संगम घराण्याची सत्ता संपुष्टात आणली व साळुव घराण्याचा पाया घातला. परंतु हे घराणे फार काळ टिकले नाही. थोड्याच काळात तुलुव घराण्याच्या वीर नरसिंहराय याने सत्ता ताब्यात घेतली.
प्रसिद्ध राजा कृष्णदेवराय (१५०९-१५२९) याच वंशाचा होता.


या साम्राज्याच्या विस्तार दक्षिणोत्तर बेळगावपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पूर्व-पश्चिम आंध्रपासून गोव्यापर्यंत झाला होता. तथापि विजयानगरचे आधिपत्य मानणाऱ्या राजांच्या प्रदेशांचा विचार केल्यास या साम्राज्याची सत्ता उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत आणि पूर्वेस कटकपर्यंत (ओरिसा राज्य) दिसते.

सुमारे सव्वादोनशे वर्षे विजयनगरच्या सम्राटांनी अधिसत्ता टिकून होती. त्या काळात त्यांनी दक्षिणेत हिंदू संस्कृतीचे संवर्धन-प्रसार-प्रचार कार्य केले आणि दक्षिणेतील मुस्लिम शाह्यांच्या राज्यविस्तारास पायबंद घातला. 

विजयनगर हंपी, पंपाक्षेत्र, होस्पेट इ. वेगवेगळ्या नावांनीही विजयानगरचा उल्लेख केल्याचे दिसून येते. इ. स. १३७३ च्या सुमारास विद्यानगरची (विजयानगर) सेना दक्षिण समुद्रापर्यंत पोहोचली. जवळजवळ दक्षिण हिंदुस्थानातील संपूर्ण प्रदेशावर या सेनेने दिग्विजय मिळविला. त्याप्रीत्यर्थ पहिल्या बुक्क राजाने "विद्यानगर" या आपल्या नगरीचे नाव बदलून "विजयनगर" असे ठेवले. तथापि स्थानिक लोक "हंपी" असाच याचा उल्लेख करतात. 

१५ व्या शतकाच्या मध्यास मुस्लिम शाह्यांत आपसांत संघर्ष सुरू होता. आदिलशाह व कुतुबशाह यांचे काही प्रदेश रामराजाने घेतले तसेच निजामशाहचा मुलूख घेऊन त्याला शरण आणले. परिणामतः या सर्वांनी एकजूट करून रामराजावर स्वारीचा बेत आखला. तिचेच रूपांतर १५६५ च्या तालिकोटच्या भीषण लढाईत झाले.


हल्लीच्या विजापूर जिल्ह्यात रक्कसगी व तंगडगी या गावांदरम्यान ही लढाई झाली. त्यात विजयनगर विरुद्ध विजापूरचा आदिलशाह, अहमदनगरचा हुसेन निजामशाह, बीदरचा अली बरीदशाह आणि गोवळकोंड्याचा इब्राहिम कुतुबशाह यांनी भाग घेतला. या लढाईत विजयनगरच्या फौजेचा दारुण पराभव झाला. 

रामराजाला पकडून ठार मारण्यात आले. चारही शाह्यांमध्ये हुसेन निजामशाहचे वर्चस्व होते. रामराजाबरोबर त्याचा भाऊ वेंकटाद्रीही मारला गेला. त्याचा तिसरा भाऊ तिरुमलराय हा पळून गेला. त्याने नंतर पेनुकोंडे येथून राज्य करण्यास प्रारंभ केला. 

विजयनगरला कोणीच वाली उरला नसल्यामुळे कितीतरी महिने त्याची लूट चालूच होती. एकेकाळी अत्यंत वैभवसंपन्न असलेले हे नगर काही महिन्यांतच बेचिराक झाले. 

तिरुमलरायानंतर त्याचे दोन पुत्र अनुक्रमे दुसरा श्रीरंग आणि दुसरा वेंकट हे गादीवर आले. वेंकट हा या वंशातील शेवटचा महत्त्वाचा राजा होय. त्याने दक्षिण भारतात आपल्या राज्याचा विस्तार केला.
श्रीरंगाच्या कारकीर्दीत पेनुकोंड्याहून चंद्रगिरीला राजधानीचे स्थलांतर झाले. पुढे काही वर्षांनंतर "वेल्लोर" ही विजयानगरची राजधानी करण्यात आली. विजापूरच्या फौजांनी १६४६मध्ये अखेरचा राजा चौथा श्रीरंगचा पराभव करत विजयनगर साम्राज्याचा अस्त केला.


त्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी "तोरणा" जिंकत महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. हिंदुसत्ता विजयनगरमध्ये लोप पावून जणू काही ती महाराष्ट्रात पुनरुज्जीवितच झाली.
संदर्भ :
  • A Forgotten Empire Vijayanagar by Robert Sewell
  • Archeology, Art & Religion by Anila Verghese
  • विजयनगर हृदयस्थ साम्राज्य - डाॅ. अस्मिता हवालदार

टिप्पण्या

  1. जबरदस्त लिखाण केले आहे सर.
    मी शालेय अभ्यासक्रमात विजयनगर साम्राज्याचा इतिहास वाचलेला परंतू ते एक समृद्ध भारतीय राज्य होते एवढंच ठाऊक होते.
    तुमचे लिखाण वाचून कळले कि हरीहर बुक्क‌ आणि त्यांचे बंधू यांचे काय कर्तुत्व होते.
    एक वैभवशाली हिंदू साम्राज्य कसे होते.
    असेच लिखाण करीत माहिती देत राहा.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपला इतिहास आपल्यापासून लपवून ठेवत फक्त परकीयांचा इतिहासचं आपल्याला जास्त शिकवला गेला.इथून पुढे ही आपल्या इतिहासातील सुवर्ण पाने आपल्या सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न राहील... धन्यवाद माहिती आवडल्याबद्दल...

      हटवा
  2. एका वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार/भाग असल्यासारखे वाटले लेख वाचून.
    सविस्तर माहिती आणि ओघवते लिखाण 👌👍

    उत्तर द्याहटवा
  3. आपला इतिहास इतका देदीप्यमान असताना, गुलामीचाच इतिहास आपल्याच माणसांकडून शिकवण्यात आला. महाराजांचा इतिहास तरी परिपूर्ण आहे का शंकाच वाटते

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोरियाची भारतीय महाराणी

हजारो वर्षापूर्वी घडलेल्या रामायणाचा, प्रभू श्री रामांचा इतिहास आपणा सर्वाना माहितच आहे, पण आज आपण अयोध्येच्या इतिहासातील एका दुर्लक्षित अध्यायाकडे पाहूया...!! सुमारे २००० हजार वर्षापूर्वी अयोध्येची राजकुमारी असणाऱ्या सुरीरत्नाचा कोरियाचे महाराज किम सुरो यांच्याशी झाला. आणि याची नोंद सापडली ते १३ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या चायनीज दस्तऐवज "सामगुक युसा" मध्ये. त्यात असा उल्लेख आहे कि अयोध्येच्या राजाला दैवी दृष्टांत झाला आणि नंतर राजकुमारी सुरीरत्ना आणि दक्षिण कोरियाचे राजे किम सुरो यांचा दक्षिण कोरियातील किम-ह्ये या शहरात मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला. ज्या वंशात राणी सुरीरत्ना यांचा विवाह झाला त्याला दक्षिण कोरियात "करक वंश" या नावाने ओळ्खल जात. या करक वंशाकडे दक्षिण आणि उत्तर कोरियातील बऱ्याच भूभागाची खूप वर्ष सत्ता होती. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील "किम" आडनावाची लोक करक वंशातील आहेत अस मानल जात. "किम-ह्ये" या शहरात राणी सुरीरत्ना यांची समाधी आहे आणि तेथील लोक या समाधीला अयोध्येचा दगड वापरल्याच आवर्जून सांगतात. राण...

चौथाई – सरदेशमुखी

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. मात्र स्वराज्याचा खर्च कुठून येत असे याबद्दल मात्र आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नसेल. पूर्वी कुठलेही राज्य म्हटले कि त्या राज्याला सैन्यबळ गरजेचे असे. सैन्याबळातील सैनिक, हत्यारे, घोडे, हत्ती ई.चा खर्च आणि राजदरबाराचा सर्व खर्च भागवण्यासाठी चौथाई सरदेशमुखी आकारली जाई. चौथाई म्हणजे एकचतुर्थांश भाग.... एकूण उत्पनाच्या एकचतुर्थांश भाग वसूल करण्याची पद्धती म्हणजेच चौथाई... चौथाई ची पूर्ण रक्कम राज्याच्या दौलती मध्ये जमा केली जात असे. तर सरदेशमुखी मध्ये एकूण उत्पनाच्या एक दशांश भाग वसूल केला जात असे. सरदेशमुखीची संपूर्ण रक्कम छत्रपतींच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये जमा केली जात असे. चौथाई आणि सरदेशमुखी या जरी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांची वसुली मात्र एकत्रच केली जात असे. स्वराज्याबाहेर पण स्वराज्याच्या छत्रछायेखाली असलेल्या प्रदेशांतून चौथाई सरदेशमुखी वसूल केली जात असे.छत्रपती शिवरायांनी दमण वसई जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली आणि जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता महाराज त्यांच्याकडून चौथाई वसूल करीत....

बोथाटी - मराठ्यांचा लुप्त झालेला मर्दानी खेळ

बोथाटीचा उगम भारतात साधारणत: मुसलमानी अंमल असताना झाला असे मानले जाते. मात्र या मर्दानी खेळाची खरी जोपासना झाली ती म्हणजे मराठेशाहीत.... त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होत असे. आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. युद्ध करताना घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचे आहे ओळखून बोथाटीचा खेळ निघाला. त्यावेळी युद्धप्रसंगास केव्हाही सामोरे जावे लागत असे, परकीय शत्रू कधी आपल्यावर आक्रमण करेल याचा काहीच अंदाज नसे. म्हणून त्यावेळी सैनिक आपल्याला शस्त्रासांसह दैनंदिन सराव करत असत. घोडेस्वारांचा भाल्याचा वार करण्याचा आणि तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे टोकदार लोखंडी टोक काढून टाकून त्या ऐवजी भाल्यास चिंध्याचे कापडी गोळे किंवा लाकडी गोळे बांधून तो भाला फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत असत. अशा भाल्याचे टोक बोथट असल्याने या खेळास "बोथाटी" हे नाव पडले. घोडेस्वारांच्या अशा दैनंदिन सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले आणि अल्पावधीतच हा खेळ एक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे व...