नाव ऐकून तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल ना? साठमारी डागदारी नक्की काय प्रकार आहे??
तर ही आहेत खेळांची नावे...आपल्या मातीत घडलेल्या देशी मर्दानी खेळांची नावे...
पूर्वी राजे महाराजे करमणुकीसाठी विविध खेळांचे आयोजन करत. त्यात मदांध हत्तींशी झुंजायची ही स्पर्धा असायची. या मदांध हत्तींशी झुंजायचा खेळ म्हणजे साठमारी डागदारी..
अठराव्या एकोणिसाव्या शतकात कोल्हापूर आणि बडोद्याच्या संस्थानात हा खेळ अत्यंत लोकप्रिय होता. राज्याच्या भेटीस येणाऱ्या पाहुण्यांसाठी या साठमारी डागदारी चे आयोजन केले जात असे. या खेळासाठी खुराक देऊन हत्ती तयार केले जायचे आणि खेळाच्या वेळी त्यांना दारू पाजून व भांगेच्या वड्या खायला घालून मदांध केलं जायचं. हातात कोणतेही शस्त्र न घेता हत्तीशी लढणारे धाडसी मल्ल त्या काळी होऊन गेले. छत्रपती शाहू महाराजांनी साठमारी डागदारी साठी खास प्रशिक्षण देऊन तयार माणसे केली होती.
या खेळात मदांध हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येकी २० माणसांचे ३ गट केले जायचे. हे तीन गट मिळून माणसांची संख्या ६० व त्यांच्या हत्यारांची संख्याही ६० होत असल्याने त्यांच्यापैकी प्रत्येक माणसास ‘साठमार’ असे नाव पडले. नंतर त्यांना त्याला साठमार, साठमाऱ्या किंवा साठ्या अशी ही नावे प्रचलित झाली. बेफाम हत्तीला आटोक्यात आणण्यासाठी भाले, चिमटे, आकड्या, पोच्या, बेड्या इ. हत्यारांची मदत घेतली जात असे. हे साठमार हत्तीचा मोहरा चुकवून कधी कधी त्याच्या पोटाखाली शिरत व त्याला जोरदार गुद्दे मारून हैराण करीत असत.
साठमारी डागदारीचे मैदान = अग्गड
साठमारी डागदारीसाठी पूर्वी खास मैदान तयार केले जायचे त्याला 'अग्गड' म्हणायचे. अशा प्रकारची अग्गड कोल्हापूर संस्थानात राधानगरी, सोनतळी, रूकडी आणि पन्हाळा येथे छत्रपती शाहू महाराजांनी बांधून घेतले होते.
कोल्हापुरातील खासबागेनजीकच्या साठमारीचे मैदान असून ते २०० फुट लांब व २०० फुट रुंद आहे. सामान्यतः साठमारीचा आखाडा वर्तुळाकार असतो आणि त्याचा व्यास सुमारे २०० फुट असतो. सभोवती १५ फुट उंचीचा भक्कम दगडी कोट बांधलेला असतो. जुन्या वाड्यात ज्याप्रमाणे भिंतीतून जिने असतात, त्याप्रमाणे तटबंदीच्या ठराविक अंतरावर एक माणूस शिरेल एवढीच जागा असायची. जनतेला या खेळाचा आस्वाद घेता यावा म्हणून सभोवतीच्या भिंतीवर प्रेक्षकांसाठी गॅलरी बांधली गेली होती
हत्ती समोर व सरळ रेषेत माणसापेक्षा ही अधिक वेगाने धावू शकतो मात्र त्याच्या वजनदार शरीरामुळे तो अचानक गिरकी घेऊन धावण्याची दिशा बदलू शकत नाही. ह्याचा फायदा साठमाराला वाकडेतिकडे धावून घेता यावा म्हणून अशा प्रकारची विशेष अग्गड तयार केली जायची.
खेळाचे सर्वसाधारण स्वरूप :
मदांध हत्तीस अग्गडात एका कमानीजवळ आणून उभे केले जायचे आणि बिगुलाचा इशारा होताच हत्तीस मोकळे सोडण्यात यायचे. नंतर आजूबाजूस उभ्या असलेल्या साठमारांपैकी एकजण हत्तीच्या पुढे जात असे आणि आपल्याजवळील भाला वा डोक्यावरील शेला सोडून हत्तीपुढे नाचवून त्याला डिवचत असे.
चिडलेला हत्ती त्या साठमारामागे धावू लागताच, दुसरा साठमार त्याला चिडवून स्वत:च्या अंगावर घेत असे. हत्ती दुसऱ्या साठ्माराच्या मागे लागताच तिसरा साठमार हत्तीचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत त्याला आपल्यामागे धावण्यास भाग पाडत असे.
हत्तीला चिडवून स्वतःच्या अंगावर घेणे व हत्तीला हुलकावण्या देऊन पळायला लावणे, यात साठमाराचे साहस, कौशल्य पणाला लागत असे. हत्ती जरी स्थूल प्राणी असला, तरी त्याची सरळ दौड मनुष्यापेक्षा जास्त वेगवान असते. म्हणून हे साठमार त्याला एकाच माणसाच्या मागे एकसारखे धावू देत नसायचे.
संकटप्रसंगी कित्येकदा साठमारास आपला भाला व फेटा जागच्या जागीच टाकून पलायन करावे लागते आणि स्वतःचा बचाव करावा लागत असे. तर काही प्रसंगी अग्गडात धुराच्या साहाय्याने हत्तीस घाबरवून साठमारास वाचवावे लागते. एखाद्या साठमाराच्या अगदी जीवावरच बेतल्यास हत्तीच्या मागच्या पायांत चिमटे टाकून त्याला जेरबंद करतात व खेळ थांबविला जात असे.
डागदारी :
साठमारी सारखाच अजून एक खेळ अग्गडात खेळवला जायचा तो म्हणजे डागदारी...
घोड्यावर बसून मदांध हत्तीस खेळविणाच्या या प्रकाराला डागदारी म्हटले जायचं तर घोडेस्वाराला ‘डागदार’. या खेळासाठी घोडे खास तयार करावे लागतात. कारण घोडा अजस्त्र हत्तीला घाबरतो. हत्तीजवळ वारंवार नेऊन या घोड्यांची हत्तीविषयीची भीती नाहीशी करावी लागत असे.
या खेळात घोडा आणि घोडेस्वार या दोघांचे कसब पणाला लागत असे. घोड्याची चपळता आणि डागदाराचे साहस यांचा समतोल साधला गेला तरच हत्तीला खेळवता येत असे.
जशी जशी राज घराणे आणि त्यांची संस्थाने खालसा होऊ लागली तसतशी या खेळांना मिळणारा राजाश्रय ही बंद होऊ लागला आणि हे मैदानी खेळ इतिहास जमा झाले. आपण मुघलांचा इतिहास शिकता शिकता मोठे झालो मात्र आपल्या मातीत घडलेल्या या रांगड्या खेळाची एक साधी ओळही आपल्याला इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात असू नये हे आपलं दुर्दैव...!!
👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏😊
हटवा