"हंपी" हे मंदिरांच शहर माहिती नसलेला भारतीय आपल्याला क्वचितच सापडेल. तिथल्या मंदिरांचे अवशेष पाहून तत्कालीन वैभव आणि संस्कृतीने आपला उर आपोआप भरून येतो. पण बऱ्याच जणांना माहिती नसेल की "हंपी" हे शहर विजयनगरची राजधानी होती. चला तर आज जाणून घेऊया याच "विजयनगर" साम्रज्याबद्दल... हंपीच्या ४० ते ५० किमी परिसरात भग्नावस्थेत उभे असलेले महाल, देवदेवतांच्या मूर्ती, विविध दगडी कमानी, स्नानकुंडे, बाजारचा मुख्य रस्ता, बाजूने दुकानांच्या जागा यांचे बरेच अवशेष पाहायला मिळतात. तत्कालीन पोर्तुगीज प्रवासी डॉमीगो प्रेस म्हणतात, "हंपी सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेले जगातील सर्वात उत्तम शहर अशी त्याची ख्याती इराक-इराणपर्यंत होती." तर पर्शियन प्रवासी अब्दुल रझाक लिहितो, "माझ्या नेत्रांनी हम्पी इतके अप्रतिम शहर कुठेही पाहिलेले नाही." अनेक टेकडय़ांवर वसलेल्या शहराला एकामागोमाग वर्तुळाकार बांधकाम केलेली सात कोटांची तटबंदी, भर बाजारात दिवसाढवळ्या चांदी, सोने, हिरे, माणके, केशर यांचे ढीगचे ढीग विक्रीसाठी. देशी परदेशी व्यापाऱ्यांच्या झुंडी याने...